अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट बसला असताना ‘सारी’ (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या आजाराचाही शिरकाव झाला आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे जेमतेम सारखीच असल्याने अकोलेकरांनी आता विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.मागील सहा महिन्यांपासून कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा सहा हजाराच्या पार गेला असून, मृत्यूचाही आकडा वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होत असताना जिल्ह्यात ‘सारी’ या आजाराचाही शिरकाव झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. ही चाचणी निगेटिव्ह येताच सुटकेचा नि:स्वास सोडला जात आहे; मात्र निगेटिव्ह अहवाल आलेले सारीचे रुग्णही मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनासह सारीमुळेदेखील रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह आला तरी रुग्णांनी वेळीच खबरदारी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारास सुरुवात करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
ही आहेत लक्षणे
- एकदम सर्दी येणे
- तापाचे प्रमाण जास्त
- खूप अशक्तपणा
- न्यूमोनिया
- श्वसन दाह
- छातीत दुखणे
- रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे
यांना सर्वाधिक धोका
- लहान मुले
- ज्येष्ठ नागरिक
- कमी प्रतिकारशक्ती असणाºया व्यक्ती
- मधुमेह
- हृदयरोग असलेली व्यक्ती
रुग्णसंख्या स्पष्ट नाहीजिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना सारीचाही शिरकाव झाला. याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहितीदेखील दिली; मात्र आतापर्यंत सारीचे किती रुग्ण आढळले, याबद्दल वैद्यकीय अधिकारी बोलण्यास टाळत आहेत. कोरोना निगेटिव्ह अहवालातील गंभीर असलेले रुग्ण हे सारीचे असल्याचा दुजोरा वैद्यकीय अधिकाºयांकडून दिला जात असला, तरी रुग्णांची नेमकी आकडेवारी देण्यास टाळत आहेत.
जिल्ह्यात सारीसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आवश्यक खबरदारी घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.