अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात खोदून ठेवलेल्या १०० पाणंद रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे पावसाळा तोंडावर असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतात जाणार कसे आणि पेरणी करणार कसे, असा सवाल उपस्थित करीत पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिले.
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेत जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यात १०० पाणंद रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी संबंधित रस्ते खोदण्यात आले; मात्र खोदून ठेवण्यात आलेल्या या रस्त्यांवर अद्याप मुरुम टाकण्यात आला नाही किंवा खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने, पावसाळ्यात शेतकरी शेतात जाणार कसे आणि पेरणी करणार कसे, अशी विचारणा करीत संबंधित पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिल्याचे माहिती कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, माजी महापाैर विजय अग्रवाल तेजराव पाटील थोरात, प्रशांत कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून भारसाकळे यांच्या आंदाेलनाला पाठिंबा देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आमदारांनी घेतला आक्षेप !
अकोट व तेल्हारा तालुक्यातील खोदून ठेवलेल्या रस्ते कामांच्या मुद्यावर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यामध्ये संबंधित रस्त्यांची कामे पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर आ. भारसाकळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर संबंधित रस्त्यांची कामे सुरू करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले; मात्र कामे पूर्ण करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने आ. भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन सुरू केले. येत्या पंधरा दिवसांत पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.