अकोला: शहरातील एसटी बस आगारमध्ये विविध जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गाड्या मुक्कामी असतात. कोरोनाच्या काळात मुक्कामी चालक-वाहकांची झोपण्याची योग्य व्यवस्था करण्याची गरज असताना याउलट त्यांची गैरसोय होत आहे. कुठलेही सॅनिटायझेशन नाही, मच्छरांचा त्रास, सर्वत्र घाण अशा स्थितीत जेवण करून रात्र काढावी लागत आहे. या व्यवस्थेला कंटाळून अर्ध्यापेक्षा जास्त वाहनचालक एसटीच्या टपावर किंवा बसमध्ये झोपने पसंत करत आहेत. कोरोनाच्या काळात एसटी बसच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. तरीही नागपूर, पांढरकवडा, औरंगाबाद, जळगाव खान्देश या ठिकाणावरून मोठ्या संख्येने एसटी बस शहरातील एसटी आगारात रात्री मुक्कामी असतात. कोरोनाच्या संसर्गातही बसचालक-वाहक सेवा देत आहेत. दिवसभर बस चालविणे, प्रवासी वाहतूक करणे आणि अपुऱ्या झोपेचा ताण वाढत आहे. अशा स्थितीत चालक-वाहकाची रात्रही सुखकर होत नसल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाने कोरोनाचे नियम पाळत चालक-वाहकांना योग्य सुविधा देण्याची गरज होती; परंतु केवळ एका आराम खोलीच्या व्यतिरिक्त इतर कुठेही झोपण्याची व्यवस्था नसल्याने सोशल डिस्टन्स न पाळता झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुक्कामी आगारात पोहोचल्यानंतर आराम खोलीत पिण्याचे पाणी नाही, साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण पसरलेली आहे. या अस्वच्छ वातावरणात स्वत: आणलेल्या डब्यातून जेवण करावे लागते. खोलीच्या खिडक्या तुटलेल्या असून, झोपण्यासाठी असलेली एकमेव चादरही फाटक्या अवस्थेत आहे. बाथरुमला दरवाजा नसल्याने संपूर्ण खोलीत दुर्गंधी पसरत आहे. नाइलाजास्तव अर्ध्यापेक्षा जास्त चालक-वाहकांना एसटी बसेसच्या टपावर किंवा आत झोपावे लागत आहे. या प्रकारावरून महामंडळ चालक-वाहकांच्या आरोग्याच्या बाबतीत किती तत्पर आहे, हे दिसून येते.
--बॉक्स--
ना सॅनिटायझेशन, ना सोशल डिस्टन्स
कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर चालक-वाहकांच्या आराम खोलीचे सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे; मात्र या खोलीचे सॅनिटायझेशन तर दूरच स्वच्छताही करण्यात येत नाही. जागा अपुरी असल्याने सोशल डिस्टन्सचा पार बोजवारा उडतो.
--बॉक्स--
रात्री मंदिराचा आधार
आराम खोलीत जागा नसल्याने काही चालक-वाहक आगारात असलेल्या हनुमान मंदिरात रात्र काढतात. त्या ठिकाणी एक पंखा व झोपण्यासाठी ओटा असल्याने आठ ते दहा चालक-वाहक झोपलेले असतात.
--मच्छरांचा उच्छाद कायम--
मुक्कामी चालक-वाहक मच्छरांच्या उच्छादामुळे सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, अनेक जण घरूनच मच्छरदाणी आणत असल्याचे निदर्शनास आले.