अकोला : देशात डिझेलचे दर वाढत असल्याने शेतीव्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत. गत सहा महिन्यांत मशागतीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ट्रॅक्टरद्वारे शेती करणे तोट्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
सध्याचे युग हे यांत्रिक युग असल्याने शेतकरी यांत्रिक शेतीला पसंती देतात. पूर्वी शेतीची कामे बैलांच्या साहाय्याने केली जात होती; मात्र सद्य:स्थितीत बैलांची संख्या कमी झाली असून, ट्रॅक्टरद्वारे शेती करण्यावर भर दिला जात आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत त्वरित होत असल्याने नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक, रोटाव्हेटर, गवत कापणे आदी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. गत काही दिवसांपासून डिझेलचे भाव वाढत असल्याने याचा परिणाम शेती मशागतीवर झाला आहे. सध्या डिझेलचे दर ८६ रुपये प्रति लिटरवर पोहोचल्याने ट्रॅक्टरमालकांनी कामांचे दर वाढविल्याचे चित्र आहे. डिझेल महागल्याने जास्त खर्च होत आहे, काही पैसे शिल्लक राहावे म्हणून ट्रॅक्टरद्वारा मशागतीचे दर वाढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी पुरविण्यात येणाऱ्या डिझेलचे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरमालकांनी कामांचे दर वाढविले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत मशागतीचे कामे करण्यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
- समाधान वाघ, शेतकरी
डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या कामांचे दर वाढवावे लागले आहेत. डिझेलचे दर कमी होताच दर कमी करण्यात येतील. डिझेल वाढल्याने कमी दरात काम करणे परवडणारे नाही.
- जगन्नाथ इंगळे, ट्रॅक्टरमालक.