बार्शी टाकळी तालुक्यांतर्गत जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे व आडवळणावर धाकली हे गाव आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावशिवारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे पीक बहरात आहे. अशातच तुरीच्या हिरव्या शेंगांची चोरी करून त्याची विक्री वाशिम जिल्ह्यात केली जात आहे. या माध्यमातून दारू, गांजाच्या व्यसनावरील खर्च भागविण्याचा उपद्व्याप लगतच्या काही गावांतील भुरट्या चोरट्यांनी चालविला आहे. त्यामुळे धाकलीतील शेतकरी जेरीस आले आहेत. याबाबतची माहिती पिंजरचे ठाणेदार एम.एन. पडघान यांना देण्यात आली. त्याआधारे त्यांनी कारवाईच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वीदेखील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सोंगणी करून लंपास करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भुरट्या चोरट्यांनी अशाप्रकारे शेतमालावरच हात साफ करण्याचे प्रकार घडत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांनी या भागात गस्त वाढवून हे प्रकार रोखावे, अशी मागणी होत आहे.
धाकली शिवारात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:51 AM