महान : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फुटापर्यंत वाढली असून, सोमवार, १२ जुलैपर्यंत धरणात ३०.८२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. २९ दिवसांनंतर पाणीपातळीत वाढ झाली असून, चौथा व्हॉल्व्ह हा अर्ध्यापर्यंत पाण्याखाली आला होता.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर १३ जून रोजी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पाणीपातळीत दीड फुटाने घट झाली होती. जिल्ह्यात १० व ११ जुलै रोजी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने तब्बल २९ दिवसांनी महान धरणाच्या जलसाठ्यात दीड फुटाने वाढ झाली आहे. धरणातील वाढत्या जलसाठ्याकडे सहायक कार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नीलेश घारे, एस. व्ही. जानोरकार, मनोज पाठक हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत. (फोटो)
--------------------------------------------------
१२८ मि.मी. पावसाची नोंद
दि. १ जून ते १२ जुलै रोजी सकाळी १० वाजतापर्यंत महान पाटबंधारे विभागात एकूण १२८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दि. ११ जुलै रोजी महान धरणात ११२१.५० फूट, ३४१.८४ मीटर, २३.४२७ द.ल.घ.मी. व २७.१३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यानंतर चांगला पाऊस बरसल्याने दि. १२ जुलै रोजी ११२३ फूट, ३४२.२९ मीटर, २६.६१८ द.ल.घ.मी. व ३०.८२ टक्के एवढा जलसाठा धरणात उपलब्ध आहे.
--------------------------------
चौथा व्हॉल्व्ह अर्धा पाण्याखाली!
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात पाच व्हॉल्व्ह बसविलेले आहेत. त्यापैकी तीन व्हॉल्व्ह पाण्याखाली होते. गत दोन दिवसांत पाऊस वाढल्याने पाणीपातळीत वाढ झाली असून, चौथा व्हॉल्व्ह अर्धा पाण्याखाली गेला आहे.
---------------------
मुख्य वक्रद्वारापासून पाणी केवळ दोन फूट दूर
महान धरण हे अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठे १० वक्रद्वारांचे धरण असून, या धरणाच्या प्रत्येक वक्रद्वाराची साइज १६ बाय ४० फुटांची असून, धरणाचे पाणी मुख्य वक्रद्वाराच्या खालच्या टोकाला टेकण्यासाठी केवळ दोन फूट दूर आहे.
--------------------------------