अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवास करण्यावर निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे गतवर्षी २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर, अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरू केल्या. जिल्ह्यात सुरुवातीला दिवसभरातील प्रवासीसंख्या सहा हजार होती. मात्र, त्यानंतर प्रवासीसंख्या वाढायला लागली. ही संख्या दिवसभरात ६० हजारांवर पोहोचली होती. आता गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे २३ फेब्रुवारीपासून पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही एसटीच्या प्रवाशांच्या संख्येवर याचा पाहिजे तसा परिणाम झाला नाही.
चार ते पाच हजार प्रवाशांचा अपवाद वगळता इतर प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. एसटीच्या मर्यादित फेऱ्याच रद्द करण्यात आल्याने मागील लॉकडाऊनसारखा यावेळी एसटी महामंडळाला सध्यातरी आर्थिक फटका बसलेला नाही. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रवाशांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याची गरज आहे.
तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरच्या वापराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एसटी महामंडळानेही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
आंतर जिल्ह्यातही प्रवासी वाहतूक
जिल्ह्यातील सातही आगारांतून जिल्हाबाह्य प्रवासी वाहतूक सुरू आहे. लांब पल्ल्याच्याही बसफेऱ्या धावतात. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या ठिकाणाहूनही प्रवासी प्रवास करत आहेत. यामुळे या प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
कोरोनानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवासी वाढल्याने बस भरून धावत आहेत. मात्र, बहुतांश प्रवासी मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत, तसेच बसमध्ये गर्दी राहत असल्याने एका सीटवर कधी दोन, तर कधी तीन जण बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण, तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेऱ्या बंदच
‘गाव तेथे एसटी’ अशी राज्य परिवहन महामंडळाने मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत जेथे रस्ता असेल, तेथे एसटी धावत होती. मात्र, कोरोनामुळे गत २३ मार्चपासून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, परंतु अद्यापही ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी प्रवास करताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.