महापालिका क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, घराेघरी काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. साेशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे अकाेलेकरांना संसर्गाची लागण हाेत असल्याची परिस्थिती आहे. काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांना चाचणीसाठी मनपा प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी चाचणी केंद्र सुुरू केले आहेत. मध्यंतरी दुकानदार, व्यापाऱ्यांना व त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली हाेती. परिणामी, काेराेनाची लागण झालेल्यांचा खरा आकडा समाेर आला हाेता. मागील काही दिवसांपासून शासनाने व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे नागरिकांची रेलचेल कमी झाली आहे, असे असले, तरी काेराेनाची लक्षणे असतानाही नागरिक चाचणी करीत नसल्याची बाब समाेर आली आहे. यावर उपाय म्हणून झाेननिहाय गठीत केलेल्या चाचणी पथकांना गर्दीच्या परिसरात चाचणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
म्हणून रुग्णांची प्रकृती चिंताजनक!
अंगात ताप आल्यास अनेक रुग्ण काेराेनाची चाचणी न करता, रहिवासी भागातील एखाद्या डाॅक्टरकडून औषधी आणतात़ सुरुवातीला पाच-सहा दिवस औषधी घेतल्यावर रुग्णाला बरे वाटते. त्यानंतर, रुग्णाला श्वास घेण्यास त्रास सुरू हाेताे. अशा वेळी रुग्णाचा सिटी स्कॅनचा स्काेअर तपासल्यानंतर ताे १० पेक्षा अधिक झाल्याचे समाेर येते, ताेपर्यंत रुग्णाची प्रकृती चिंताजनक हाेते. त्यामुळे अंगावर दुखणे न काढता, तातडीने काेराेना चाचणी करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
फिरत्या वाहनांचा लेखाजाेखा घ्या!
अकाेलेकरांना त्यांच्या परिसरात चाचणी करता यावी, या उद्देशातून प्रशासनाने चार फिरत्या वाहनांद्वारे चाचणीला सुरुवात केली. या प्रत्येक वाहनात चार आराेग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसते. मागील साडेतीन महिन्यांच्या कालावधीत फिरत्या पथकांनी घेतलेले दैनंदिन नमुने व त्या बदल्यात वाहनांवर इंधनापाेटी झालेल्या खर्चाचा मनपा आयुक्तांनी लेखाजाेखा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.