अकोला : राज्यात दुसर्यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास फळधारणेवर आलेली पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर, म्हणजेच १ कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकर्यांनी विविध पिकांची पेरणी केली; पण जून महिन्याच्या पावसानंतर दीड महिना दडी मारल्याने पिकांना अगोदरच फटका बसला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस आला, त्यानंतर पुन्हा २0 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळाचे सावट कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नव्हते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असून, या तापमानाने पुन्हा जमीन भेगाळली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. विदर्भातील शेतकर्यांनी जून महिन्यात कापूस, सोयाबीन, कडधान्य, गळीत, तृणधान्य व धान पिकांची जवळपास ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जून महिन्यात पेरणी केलेल्या काळ्य़ा, भारी जमिनीतील पिकांना ऑगस्ट महिन्यातील पावसाने दिलासा दिला. या पिकांची वाढ जरी कमी असली तरी सध्या सोयाबीनला फुलोरा व शेंगा येत आहेत, तर कापसाला पात्या, फुले धरली आहेत. शेंगा व बोंडे परिपक्व होण्यासाठी याचवेळी पावसाची नितांत गरज आहे; पण गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत. २0 जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणी केलेल्या पिकांनासुद्धा या पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात आतापर्यंंत ५0८. ९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी असला तरी हा पाऊस केवळ चार दिवस पडला. पावसाचे दिवस २२ असले तरी इतर दिवशी तुरळक स्वरू पाचाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांना चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
विदर्भात तापमानात वाढ; पिके कोमेजली
By admin | Published: August 25, 2015 1:50 AM