महान : अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. महिनाभरात धरणाची पातळी सहा फुटाने वाढली आहे. रविवार, दि. १८ जुलै रोजी धरणात ११२५.९० फूट, ३४३.१७ मीटर, ३३.१८७ द.ल.घ.मी. व ३८.४३ टक्के जलसाठा उपलब्ध असून, १ जून ते १८ जुलै दुपारपर्यंत १७६ मिमी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागाने केली आहे.
महान येथील काटेपूर्णा धरणाला एकूण १० वक्रद्वार असून, प्रति वक्रद्वार १६ बाय ४० फूट साइज असल्याने आज रोजी धरणाचे पाणी या मुख्य गेटवर एका फुटापर्यंत पोहोचले आहे. धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी १५ फूट पाण्याची आवश्यकता आहे. ३४ दिवसांत चारवेळा धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामध्ये १५ जून रोजी दीड फूट, १३ जुलै रोजी दीड फूट, १५ जुलै रोजी दोन फूट व १८ जुलै रोजी एक फुटाची वाढ जलसाठ्यात झाली आहे. वाढीव जलसाठ्याकडे महान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नीलेश घ्यारे व सहकारी मनोज पाठक हे लक्ष ठेवून आहेत.
पाचवा व्हाॅल्व्ह उघडेच!
१५ जुलैपूर्वी महान धरणात केवळ २७ टक्क्यापर्यंतच जलसाठा उरला होता. त्यानंतर ११ टक्क्यांनी वाढ होऊ जलसाठा ३८.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस बंद असल्याने महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. धरणाचा पाचवा व्हॉल्व्ह पाण्यापासून दूर असून, उघडाच दिसून येत आहे. परंतु तरीही वाढलेल्या जलसाठ्यामुळे धरणाचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र जलमय दिसत असून, डोळ्यांचे पारणे फेडत आहे.