लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जलजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रूग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, लहान मुले व वृद्ध त्रस्त झाले आहेत. यात सर्दी, तापेच्या रुग्णांबरोबरच खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या खोकल्याने कहर केल्याने शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयातही खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात शासनातर्फे एक जिल्हा सामान्य रुग्णालय, १५ ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात विविध जलजन्य आजार डोकेवर काढतात. सध्या वातावरणात अचानक बदल झाल्याने व गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने सामान्य रूग्णालय तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयेसुद्धा हाऊसफुल्ल झाले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, १५ ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामधील ओपीडीचा आकडा वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, ताप, खोकला व फंगल इन्फेक्शनचे आहेत. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दिवसाकाठी १५० ओपीडी होत आहे. तर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात १२५ ते १५० पर्यंत ओपीडी जात आहे, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा आहे. तसेच एका प्राथमिक आरोग्य केंद्राची दिवसाची ओपीडी सुद्धा १०० च्यावर जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व कुठे रिमझीम पाऊस हजेरी लावत असल्याने जलजन्य आजाराला उभारी मिळत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मच्छरांचे प्रमाण वाढून तापेच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या रूग्णांच्या संख्येत काही रूग्णालयात खाटांची कमतरता असल्याचेही दिसून येते. एका रुग्णालयात दिवसाकाळी शेकडो रूग्ण उपचारासाठी येत आहेत. ग्रामीण रुग्णालयाबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
खाजगी डॉक्टरांची चांदीग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र हाऊसफुल्ल झाल्यामुळे याचा फायदा खाजगी डॉक्टरांना होत आहे. खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने खाजगी डॉक्टरांची चांदी आहे.
फिरस्तीच्या डॉक्टरांनी गाठली शंभरीसध्या गावोगावी खाजगी डॉक्टर फिरुन रुग्णांवर उपचार करत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये असे डॉक्टर दररोज पोहचतात. सध्या वातावरणातील बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली असून, परिणामी फिरस्तीच्या या डॉक्टरांची दिवसाठी १०० ते १२५ रुग्ण तपासणी होत आहे. फिरस्तीचे हे डॉक्टरांकडे सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारचे रुग्ण सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
वातावरणातील बदलामध्ये आजाराचे प्रमाण वाढू नये, यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावर सुद्धा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, साथरोग पेटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे.- डॉ.एस.पी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.--