अकोला : हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असली तरी याच थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजारही डोके वर काढतात. सांधेदुखी टाळण्यासाठी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणे टाळावे. तसेच झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात ठेवावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये. त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणे टाळावे. शिळे आणि थंड अन्न घेऊ नये. थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणे टाळावे. हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी आणि मजबुतीसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. हिवाळ्यात हलका व्यायाम करून सांधेदुखीचा त्रास टाळता येऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
किमान तापमान १४ अंशांवर
- अलीकडच्या काळात जिल्ह्यात हळूहळू थंडी वाढत असल्याचे दिसून येते. किमान तापमान १४ ते १६ अंशांवर स्थिर राहत आहे.
- संधिवाताचा त्रास असलेल्यांना हिवाळा सुरू झाल्यावर मुख्यत्वे सांधे खूप दुखू लागतात.
- कोमट पाणी पिणे, ताजा व गरम आहार घेण्याचा सल्लाही दिला जातो.
व्हिटॅमिन डी आवश्यक
संधीवाताच्या आजारासह शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी झाल्याने सांधेदुखीचा त्रास वाढतो. हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन ‘डी’च्या माध्यमातून कॅल्शियम मिळते. दैनंदिन आहारात कॅल्शियम देणारी जीवनसत्त्वे (मुळा, गाजर, मेथी, इतर भाजीपाला) घेणे गरजेचे आहे.
दररोज व्यायाम करा!
रोज व्यायाम करणे हिवाळ्यात फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्या शिरा मोकळ्या होतात. शिरांमध्ये तणाव असल्यास मोठा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज हलका व्यायाम करणे, थोडे जॉगिंग करणे फार महत्त्वाचे आहे. योगदेखील याकरिता फार उत्तम मानला जातो.
सांधेदुखीचे रुग्ण वाढताहेत
हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवतो. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होता कामा नये. यासाठी व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसेच वात असलेल्या रुग्णांनी उपचार बंद पडू देऊ नये.
- डॉ. मेहुल लोहाना,
अस्थिरोगतज्ज्ञ, अकोला
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. कॅल्शियमची कमतरता होऊ नये यासाठी व्हिटॅमिन डी यावर भर द्यावा. हिवाळ्यात सांध्यांची योग्य काळजी घेतल्यास हिवाळा सुसह्य होतो.
- डॉ. अमोल रावणकर, अस्थिरोगतज्ज्ञ, अकोला