--------------------------------
वरूर जऊळका येथे मास्कचे वितरण
वरुर जऊळका: येथील भारतीय जनता युवा मोर्चा शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजूंना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन डोईफोडे, विठ्ठल वाकोडे, अनिल शर्मा, काशीनाथ हिंगणकर, विनोद ईसेकार, गोपाल डोके, अक्षय पाचपोहे, महेश ढाकणे, गणेश पडोळे, शुभम ओखारे, प्रतीक थोरवे, पत्रकार दयाराम घनबहादूर उपस्थित होते. (फोटो)
--------------------------------------
पातूर येथे आणखी दोन पॉझिटिव्ह!
पातूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार प्राप्त अहवालानुसार शहरातील आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
-----------------------------
अतिक्रमणमुक्तीचा संकल्प कागदावरच!
बाळापूर: न.प.ने शहरात ‘अतिक्रमण हटाओ’ मोहीम गतवर्षी राबविली होती. बसस्थानक परिसरासह शहरातील ५० ते ६० दुकाने काढण्यात आली होती. पालिकेने अतिक्रमणमुक्तीचा केलेला संकल्प आता कागदावरच आहे. शहरात बसस्थानकाच्या समोर अतिक्रमण वाढले आहे.
----------------------------------
बसस्थानकात अवश्यक सुविधांचा अभाव!
अकोट: येथील बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महिलांसाठी स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. तसेच बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
---------------------------------------
पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
तेल्हारा : सध्या शेतमाल घरी आलेला आहे. आता बहुतांश शेती रिकामी झालेली आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पांदन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्यातील अनेक शिवारात धुऱ्यालगत असलेल्या शिव व पांदन रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. पांदन रस्ते अतिक्रमणात गडप होत आहेत.
--------------------------------------------------
बाजारपेठेत कोरोना नियमांचे उल्लंघन!
मूर्तिजापूर: येथील बाजारपेठेत नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. मास्क लावणे व सॅनिटायझर वापरण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याने कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत आहे.
------------------------------------------
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त!
बोरगाव मंजू : गत तीन ते चार दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वारांच्या अंगावर कुत्रे धावून जात असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------------
माठाची मागणी घटली; व्यावसायिक अडचणीत
वाडेगाव: कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माठ विक्रीत घट झाली आहे. तसेच मागणी घटल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.