संतोष येलकर/अकोला : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात मजुरांकडून कामांच्या मागणीत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीच्या पावसाळय़ातही मराठवाडा व विदर्भासह राज्यातील विविध भागात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने, शेतमजूर अडचणीत सापडला असून, कामाच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी परिस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांकडून कामांच्या मागणीत वाढ झाली आहे. रोहयो अंतर्गत गत ३१ ऑगस्टअखेरपर्यंत राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागातील ३६ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ८५९ कामांवर ९१ हजार ९९९ मजुरांची उपस्थिती होती. त्यानंतर आठवडाभरात म्हणजेच ५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सहा विभागात ग्रामपंचायत स्तरावर आणि विविध यंत्रणांच्या १४ हजार ५३0 कामांवर १ लाख १२ हजार ७८४ मजूर काम करीत आहेत. आठवडाभराच्या कालावधीत राज्यातील विविध भागात रोहयो अंतर्गत कामांवर २0 हजार ७८५ मजुरांची उपस्थिती वाढल्याने, दुष्काळी परिस्थितीत मजुरांकडून रोहयो अंतर्गत कामांसाठी मागणीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
अमरावती विभागात रोहयो कामांवरील मजूर उपस्थिती!
जिल्हा कामे मजूर
अकोला १६२ १0६४
बुलडाणा ३४५ २५१९
वाशिम १७९ १0९९
अमरावती १६६१ ८९७८
यवतमाळ २६१ १४६७
..............................
एकूण २६0८ १५१२६