राहेर : पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सावरगाव परिसरात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच काही शेतकऱ्यांची शेती खरडून गेली होती. त्यावेळी प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामासुद्धा करण्यात आला होता, परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही भरपाई अद्यापही देण्यात आली नाही, तरी मदत खात्यात २९ डिसेंबरपर्यंत जमा करावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. निवेदनातून सावरगाव येथे ओला दुष्काळ जाहीर करावा, रोजगार हमीची कामे उपलब्ध करावी, पुन्हा सर्व्हे करून शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. निवेदनाची प्रत पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी बाळापूर, पोलीस अधीक्षक अकोला, पोलीस निरीक्षक, पातूर यांना देण्यात आल्या आहे. उपोषणात रामभाऊ कांबळे, दिलीप अवचार, दिनकर अवचार, गजानन चोंडकर, देवीदास बेर भय्या, बबन डाखोरे, नारायण करवते, सदाशिव रामचवरे, लालचंद चौधरी, ज्ञानदेव लाड, नारायण करवते, पंडित इंगळे, देवानंद डाखोरे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. (फोटो)
-----------------
सावरगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, शेतातील पिकांसोबत अनेक घरांची पडझड झाली होती. नुकसानग्रस्तांना तत्काळ शासकीय मदत द्यावी.
-बळीराम सिरस्कार, माजी आमदार, बाळापूर
---------------
अतिवृष्टीमुळे पिकांची पेरणी करण्यासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. उत्पादन शून्य झाल्यामुळे कर्ज कोठून भरायचे, असा पश्न पडला आहे.
-रामभाऊ काबंळे, शेतकरी, सावरगाव
-------------------------
तालुक्यातील अनेक गावांतील नुकसानग्रस्तांना शासनाने मदत केली आहे. उर्वरित गावकऱ्यांना शासनाकडून मदत निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल.
-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर