अकोला : ‘देसीज अराउंड रॉकी हिल’ या कनेक्टिकट अमेरिका येथील भारतीयांच्या समुहांतर्गत सलग दुस?्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सन २०१८ पासून, न्यूइंगटन येथील वल्लभधाम मंदिराचे विश्वस्त राजीव देसाई यांच्या सहकायार्ने आणि उपेंद्र व सीमा वाटवे ह्या दाम्पत्याच्या पुढाकाराने, दुर्गेश जोशी, अभिजित दानवे, अभिजित वग्गा, प्रफुल्ल कुलकर्णी, आशय साठे अशा काही हौशी मंडळींनी कनेक्टिकट मधील सर्व भारतीय कुटुंबांना एकत्र आणून संपूर्ण १० दिवस साग्रसंगीत श्री गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला तोच हेतू समोर ठेऊन गणेशोत्सव केवळ मराठी कुटुंबांपुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांना त्यात सामावून घेण्याचा ह्या मंडळाचा प्रयत्न आहे.
संपूर्ण १० दिवस रोज संध्याकाळी किमान २०० भारतीय एकत्र आरतीला जमतात. प्रत्येक दिवशीच्या आरतीसाठी किमान आठ ते दहा यजमान कुटुंबे असतात आणि त्यांच्याकडेच त्या दिवशीचा सर्वांसाठीचा प्रसाद असतो. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून, दिवसेंदिवस भारतीयांचा प्रतिसाद वाढतच आहे.