राजेश शेगोकार
अकोला - भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून देशातील १०० जिल्हे जलयुक्त करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी दिली आहे. या संदर्भात भारतीय जैन संघटनेचा भारत सरकारच्या निती आयोगाशी सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करताना. या १०० जिल्ह्यांमध्ये अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे असे त्यांनी सांगितले.
शास्त्रीनगरातील जैन स्थानकांत आयोजित सभेत नंदकिशोर सांखला बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. नवनियुक्त राज्य सचिव दीपक चोपडा, विभागीय अध्यक्ष संजय आंचलिया, प्रा. सुभाष गादीया, दिलीप जैन, चंद्रशेखर चोरडिया इत्यादी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी किशोर बोथरा,प्रा. दिलीप डोणगावकर आणि प्रा. सुहास उदापूरकर यांचे हस्ते नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर सांखला आणि सचिव दिपक चोपडा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.