अकाेला: महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला असून राज्य शासनाने १३९ ठराव निलंबित करण्यासह २० ठराव विखंडित केले. या गंभीर प्रकरणी फाैजदारी तक्रार दाखल करण्याच्या शासनाच्या आदेशाला मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी केराची टाेपली दाखवत भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आराेप बुधवारी पत्रकार परिषदेत विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केला. दाेषी पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल केले नाहीत, याचा आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी पठाण यांनी केली.
सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीमध्ये विकास कामांवर चर्चा न करता नियमबाह्यरीत्या प्रस्ताव मंजूर केले. काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सूचनांना जाणीवपूर्वक डावलण्यात येऊन निधी वाटपात मनमानी केली. सत्तापक्षाच्या मनमानीला तत्कालीन आयुक्तांनी वेसण घालणे अपेक्षित असताना प्रशासनाने सत्ताधाऱ्यांसमाेर गुडघे टेकल्याचे परिणाम समाेर आले आहेत. शासनाने सत्ताधारी भाजपच्या मनमानी कामकाजावर शिक्कामाेर्तब करीत १३९ ठराव निलंबित करण्यासह २० ठराव विखंडित करण्याचा आदेश जारी केला. तसेच सत्तापक्षातील आजी-माजी महापाैर व तत्कालीन आयुक्तांविराेधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतरही मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी कायद्याच्या सबबी पुढे करीत तक्रार नाेंदविण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आराेप विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला मूकसंमती देणाऱ्या आयुक्तांनी याप्रकरणी खुलासा करावा, अन्यथा आगामी दिवसांत त्याचे परिणाम भाेगण्यास तयार राहण्याचा इशारा साजीद खान यांनी दिला. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महानगराध्यक्ष डाॅ. प्रशांत वानखडे, नगरसेवक माेहम्मद नाैशाद, इरफान खान, रवि शिंदे, माेंटू खान, जमीर बर्तनवाले यांसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
घाेळ घालणाऱ्यांसाेबत आयुक्तांची चर्चा!
सत्ताधारी भाजपला शासनाने जाेरदार हिसका दाखवल्यानंतरही शासनाच्या प्रतिनिधी असलेल्या आयुक्त द्विवेदी घाेळ घालणाऱ्या सत्तापक्षासाेबत चर्चा करतात. त्यांना या गंभीर प्रकरणी विराेधी पक्षासाेबत चर्चा करण्याची गरज वाटू नये, यापेक्षा अकाेलेकरांचे आणखी काेणते दुर्दैव असेल, असा टाेला साजीद खान यांनी लगावला.
आयुक्तांच्या विराेधात आंदाेलन
शासनाच्या आदेशानंतरही मनपा आयुक्तांनी वेळकाढूपणाचे धाेरण स्वीकारल्याचे समाेर आले आहे. यासंदर्भात शासनाला अवगत केले जाईल. सत्तापक्षाच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या आयुक्तांविराेधात तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचे काँग्रेसचे महानगराध्यक्ष डाॅ. प्रशांत वानखडे यांनी सांगितले.