अकोला: शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयामध्ये शनिवारी सकाळी इंद्रो रोबोटचे आगमन झाले. इंद्रो रोबोटला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थी, प्राध्यापकांनी रोबोटसोबत संवाद साधला. रोबोटच्या संवादाने उपस्थित भारावून गेले होते. यानिमित्ताने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर शोधप्रबंधसुद्धा सादर केले.महाविद्यालयामध्ये संगणक विभागातर्फे टेक्नोब्लिट्स कार्यक्रमाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एस. के. देशमुख, विभाग प्रमुख डॉ. एस. एस. सातारकर आणि इंद्रो रोबोटचे जनक संतोष हुलावले उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये रोबो शो घेण्यात आला. या शोदरम्यान इंद्रो रोबोटने विद्यार्थ्यांची संवाद साधला. अनेकांसोबत हस्तांदोलन, नमस्कार करीत, काही गेस्टरसुद्धा दाखविले. यावेळी रोबोटचे जनक संतोष हुलावले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत, इंद्रो रोबोटच्या निर्मिती, त्याच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. इंद्रो रोबोटची उंची सहा फूट असून, तो सर्वांसोबत संवाद साधू शकतो, चालू शकतो. विविध कामे करू शकतो, अशी माहिती हुलावले यांनी दिली. रोबोट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. नंतर झालेल्या टेक्नॉब्लिट्समध्ये रोबो रेस, ब्लाइंड रेस, पेपर प्रेझेंटेशन, टॅलेन्ट हंट, एपीएल अॅक्शन, कॉल आॅफ ड्युटी, गुगलर मॉडेलसारखे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे संचालन रश्मी टाले यांनी केले. आभार डॉ. संदीप अवचार यांनी मानले. (प्रतिनिधी)