अकोला: अकोला एमआयडीसीमधील समस्या सोडविण्याच्या कार्यपद्धतीत दिरंगाई होत असल्याची कबुली उद्योगमंत्री देसाई यांनी दिली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही कबुली दिली.शुक्रवार ता. ६/७/२०१८ रोजी सभागृहात आकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रश्न क्र. १२११२८ द्वारा अमरावती विभागातील अकोला एमआयडीसीमधील उद्योजकांच्या आणि कार्यालयातील विविध समस्यांबाबत उद्योग मंत्री यांना पत्र व स्मरणपत्र पाठवूनदेखील, कार्यवाही होत नसल्याचे बाब माहे मे २०१८ दरम्यान निदर्शनास आणली होती, हे खरे आहे काय, असल्यास उक्त औद्योगिक वसाहतीतील आॅइल आणि केमिकलशी संबंधित असलेल्या उद्योजकांना मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे अकोल्यातील उद्योग अडचणीत आले आहेत, हे खरे आहे काय, तसेच अकोला एमआयडीसीमधील कार्यक्रमाच्या वेळी उद्योजकांनी विविध समस्या उद्योग मंत्री यांच्या निदर्शनास आणल्यानंतर आठवड्यातून एक दिवस अधिकारी अकोला येथे मुक्कामी राहतील, अशी घोषणा करूनदेखील त्या संदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आली, या बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, सोबतच एमआयडीसीमधील उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, याबाबत विचारणा केली. त्यावर कामात दिरंगाई होत असल्याची स्पष्ट कबुली उद्योगमंत्र्यांनी दिली.प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी नागपूर यांच्याकडे संपूर्ण विदर्भाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अमरावती येथे पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत महसूल विभागास कळविण्यात आल्याचे सांगितले. महामंडळाने अकोला औद्योगिक विकास केंद्रातील ४००. ९५ हेक्टर क्षेत्रफळावर आरक्षित भूखंडाकरिता रस्ते, जलवितरण, पथदिवे आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. अकोल्याच्या विकासाकरिता प्राप्त झालेल्या २२. हेक्टर क्षेत्रफळाच्या आराखड्यातील रस्ते व जलवितरिका टाकण्याचे काम प्रगतिपथावर असून, अकोला औद्योगिक क्षेत्राकरिता थेट महान धरणातून पाणी उचल करून पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.