संसर्गजन्य काेराेनाला आळा घालण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने २४ मार्च २०२० राेजी देशभरात लाॅकडाऊन(टाळेबंदी) लागू केले हाेते. त्यावेळी संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला हाेता. ठप्प झालेले सर्व लहानमाेठे उद्याेग, व्यवसाय अद्यापही रुळावर आले नसून अशा स्थितीत पुन्हा लाॅकडाऊन लागू केल्यास शेतकऱ्यांच्या पाठाेपाठ आता उद्याेजक, व्यापारी व कामगारांवर आत्महत्येची पाळी येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा टाळेबंदी करून टाळेे सरकवू नये, असा गर्भित इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा उद्रेक कमी करण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने रात्री संचारबंदी लागू केली आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाकडून पुन्हा ‘लॉकडाऊन’चे संकेत दिले जात आहेत. दुसरीकडे नागपूर आणि राज्यातील काही शहरांमध्ये पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरीही या कालावधीत संबंधित शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचे समाेर आले आहे. ही परिस्थिती पाहता संचारबंदीचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उद्याेजक, व्यापारी, लघु व्यावसायिकांसह हातावर पाेट असणाऱ्या कामगारांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी लागू केल्यास संचारबंदीत उपाशीपोटी व पोटाला चिमटा देऊन मरण्यापेक्षा, काम करून मेलेले बरं, अशा संतप्त प्रतिक्रिया शहरातील बिछायत केंद्र संचालक, डेकाेरेशन कारागिर, रेडिमेड ड्रेस विक्रेता, कापड व्यावसायिक, भाजीपाला,फळ विक्रेता, रसवंती विक्रेता, किराणा दुकानदार, पाणीपुरी,चहाविक्रेत्यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केल्या.
‘लॉकडाऊन’मुळे पाेटावर पाय!
लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येला अटकाव घालता येत नाही, हे नागपूर येथील परिस्थितीवरून समाेर आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मागील दहा दिवसांत नागपूरमधील रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र समाेर आले आहे. जिल्ह्यासह शहरात काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने निश्चितच उपाययोजना कराव्यात; पण कडक लॉकडाऊन हा उपाय नाही. टाळेबंदी लागू केल्यास हातावर पाेट असणाऱ्यांच्या पाेटावर पाय दिला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
फळ विक्रेत्याने केली आत्महत्या!
शहरात व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत व्यवसाय करण्याची मुभा आहे. आधीच काेराेनाच्या संकटाने अर्थचक्राची ऐशीतैशी झाली असताना मनपाकडून लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड केली जात आहे. शुक्रवारी श्रीराम द्वारसमाेर फळ विक्री करणाऱ्या एका तरूण व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली.
मागील वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेले. वर्षभराच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली असून आता गाडी रुळावर येत असतानाच, पुन्हा लॉकडाऊनचे संकेत आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आता मरणेही महाग होईल.
-अनिल राऊत रेडिमेड ड्रेस विक्रेता
काेराेनामुळे अर्थचक्र पूर्णत: विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागल्यास आत्महत्येची वेळ येणार आहे. प्रशासनाने लॉकडाऊन ऐवजी दुसरा पर्याय शोधावा.
-अजय टाेम्पे, क्राॅकरी व्यावसायिक
मागील वर्षभर व्यवसाय ठप्प हाेता. व्याजाने पैसे घेऊन माल खरेदी केला. सायंकाळी ५ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी असताना मनपा प्रशासनाकडून दरराेज कारवाई केली जात असेेल तर व्यवसाय कसा करायचा, असा सवाल आहे.
-शेख साेहेल शेख महेबूब, प्लॅस्टिक साहित्य विक्रेता
व्यवसाय करण्याला वेळेचे बंधन असल्यामुळे भाजीपाल्याची हर्रासी व खरेदी प्रक्रिया काेलमडली आहे. यामुळे कधी जादा तर कधी बेभाव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यात भरीस भर मनपाकडून साहित्याची नासधूस केली जात आहे. प्रशासनाने जगणे मुश्कील केले आहे.
- संजय साेनटक्के, भाजीपाला विक्रेता
जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाचा परिणाम व्यवसायावर झाला असून फळ बाजार संकटात सापडला आहे. अशा स्थितीत पुन्हा टाळेबंदी लागू केल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे टाळेबंदी साेडून काहीही उपाय करा.
-शाेभराज बुलानी, फळ विक्रेता
टाळेबंदीपूर्वी रात्री ९ वाजेपर्यंत चहाचे दुकान सुरू ठेवता येत हाेते. वर्षभरापासून अर्थचक्र काेलमडले आहे. प्रशासनाने टाळेबंदी लागू केल्यास किरकाेळ व्यावसायिकांवर आत्महत्या ओढवण्याची शक्यता आहे.
-मुरलीधर सुर्वे, चहा विक्रेता
काेराेना विषाणूला आळा घालण्यासाठी प्रशासनाने लसीकरण माेहिमेचा वेग वाढवणे हा उपाय आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक नाकाबंदी झाली असून प्रशासनाने हा निर्णय पुन्हा थाेपवू नये, ही अपेक्षा.
-सुरेश लक्ष्मण गर्गे, मेकॅनिक
मागील वर्षभर टाळेबंदी असल्याने गणपती उत्सव, दुर्गा देवी उत्सव हाेऊ शकले नसल्याने डेकाेरेशनचा व्यवसाय ठप्प पडला हाेता. आता पुन्हा टाळेबंदी लागू केल्यास कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवणार,असा सवाल आहे.
-रमेश आप्पा टेवरे, डेकाेरेशन कारागीर
मागील वर्षभर व्यवसाय ठप्प हाेता. यंदा लग्न समारंभात २५ जणांना उपस्थिती अनिवार्य केली. बँकांचे कर्ज घेऊन साहित्य खरेदी केले. बॅंकेचे हप्ते फेडणे अशक्य झाले आहे. टाळेबंदी तर साेडाच प्रशासनाने आमच्या समस्या लक्षात घेउन उपाययाेजना करावी.
- गजानन चवले, बिछायत केंद्र संचालक
गत वर्षभराच्या कालावधीत टाळेबंदीमुळे किराणा व्यवसाय विस्कळीत झाला. जिल्हा प्रशासनाने दुकान खुले ठेवण्यासाठी सायंकाळी ५ पर्यंत वेळेचे बंधन घालून दिले. आता पुन्हा टाळेबंदी लागू करणे परवडणारे नाही. याचा प्रशासनाने विचार करावा.
-ज्ञानेश्वर बाेरकर, किराणा व्यावसायिक