बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु जमिनीतील ओलावा कायम असल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून आशा वाढल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहु, हरभरा पिकांना पसंती दिल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेेत्र वाढले आहे. सध्या ग्रामीण भागात हरभऱ्याचे पीक बहरलेले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरीही अळीवर नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतित वाढ झाली आहे. सध्या तालुक्यात फवारणीला वेग आला असून, कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
----------------------
१०,४५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी
गतवर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा रब्बी हंगामात १०,४५२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्यावर अळीचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
--------------------------------
तालुक्यातील प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा
बाळापूर तालुक्यात कोणत्याही प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील नेर धामणा व कारंजा रमजानपूर येथील प्रकल्प अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
------------------
खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली; मात्र सध्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली आहे.
- संतोष वानखडे, काळबाई शिवार, बाळापूर
--------------------
फोटो