नीलेश शहाकार बुलडाणा, दि. १४- यंदा परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनावरांचे चराई क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले आहे. शिवाय अलीकडेच वनपरिक्षेत्रातील बराच भाग आरक्षित झाल्यामुळे या क्षेत्रात जनावरे चराईस मनाई करण्यात आली आहे. अश्यात जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थानमधील शेळ्या, मेंढय़ा व गाई, बैलसारख्या जनावरांची घुसखोरी होत आहे. परप्रांतातून येणार्या गायी शेळ्या, मेंढय़ा व अन्य जनावरांमुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चराईचे संकट उभे राहत आहे. परप्रांतीय जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, चराईचे क्षेत्र कमी झाले. त्यामुळे या जनावरांना जिल्ह्यात बंदी करावी, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन विभागाकडे शेतकर्यांनी केली आहे.खरीप हंगामानंतर शेती मोकळी होऊन चराईच्या क्षेत्रात वाढ होऊन जनावरांना चारा उपलब्ध होते; मात्र आता शेतकर्यांच्या शेतात पिके असल्याने चराईचा प्रश्न उभा आहे. वनक्षेत्र व डोंगरपायथ्याशी पशुपालक पावसाळ्यात आपली जनावरे चराईसाठी आणून वास्तव्य करत आहे. परप्रांतीय जनावरांवर बंदी घाला!परप्रांतीय जनावरांची जिल्ह्यात संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील जनावरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या जनावरांच्या चराईवर बंदी घाला, अशी मागणी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यातील सुनगाव व पिंगळी येथील गजानन कुकडे, भीमराव घुले, बाळु नेमाने, भीमराव डोमाळे, सुभाष डोमाळे, शिवा घुले, बन्सी घुले, वामन घुले, लक्ष्मण मोरे, बाबू मोरे, गंगाराम डोमाळे, डिगांबर डोमाळे, सोना मदणे, संजय मारनर, महादेव पोकळे यांच्यासह १00 पशुपालक शेतकर्यांनी निवेदनातून केली आहे.जनावरांच्या तुलनेत चराई क्षेत्र कमीजिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ३८ हजार ९९७ आहे. तर २६ हजार २२८ हेक्टर क्षेत्र जनावरांच्या चराईसाठी उपयुक्त आहे; मात्र या क्षेत्रातील चारा जिल्ह्यातील जनावरांना वर्षभर पुरत नाही. त्यातच इतर राज्यातील जनावरांची घुसखोरी होत आहे. यामुळे आपल्या जनावरांना वर्षभर चारा कसा उपलब्ध करुन द्यावा, असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा आहे.
परराज्यातील जनावरांची घुसखोरी!
By admin | Published: October 15, 2016 2:58 AM