मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ तिखट मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. याच कालावधीत लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत गृहिणी मिरची, धने, जिरे, खसखस, खोबरे, मेथी, हळद, लवंग आदी गरम मसालाजन्य पदार्थांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात. मात्र, यंदा मिरचीचे व धन्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच कोरोनामुळे मिरची तोडण्यासाठी मजूर मिळाले नसल्याने अद्याप बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात पीक आले नाही.
तर कोरोनामुळे हळद - दूध हितकारक मानण्यात येत असल्यामुळे आणि परराज्यातही हळदीची मागणी वाढली आहे. परिणामी, परराज्यातही मोठ्या प्रमाणात हळदीची निर्यात होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसात हळद, मिरची, धने व मसालाजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणींनी यंदा हात आखडता घेतला आहे. महागाईमुळे मसाल्याच्या पदार्थांमध्ये काटकसर करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
--कोट--
वर्षभरासाठी लागणारे तिखट, हळद साठवून ठेवत असतो. दरवर्षीपेक्षा यावेळेस मसाला व मिरच्यांचे भाव वाढले आहेत. यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले असून मसाला तयार करण्यास अडचण येत आहे.
अश्विनी ताकवाले, गृहिणी
--कोट--
लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांचे भाव वाढल्याने कमी लोणचं करावे लागेल. मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव अधिक आहेत. त्यामुळे मोजकीच मिरची विकत घेऊन तिखट तयार करावे लागत आहे.
सोनाली जैन, गृहिणी