संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अमरावती विभागातील अकोला व यवतमाळ या दोन जिल्ह्यातील गतवर्षीच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची माहिती दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील माहिती दोन दिवसात ‘आॅनलाइन’ करण्यात येणार आहे.सन २०१५ मधील खरीप हंगामात अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व यवतमाळ या तीन जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीतून सन २०१६ मध्ये मदत वाटप करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बाळापूर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त ५५ गावांमधील १८ हजार ७९८ शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ अपलोड करून प्रसिद्ध करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी ५ जुलै रोजी अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची माहिती गत १४ जुलै रोजी अकोला जिल्हाधिकारी, तर १७ जुलै रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन ‘अपलोड’ करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची माहिती ‘आॅनलाइन’ करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.अशी आहे ‘आॅनलाइन’ माहिती!दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांसह बँक खाते क्रमांक व जमा करण्यात आलेली मदतीची रक्कमेबाबत माहिती अकोला व यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘वेबसाइट’वर देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मदत वाटपाची माहिती ‘आॅनलाइन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:49 AM