अकोला: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती,/विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण विभागातर्फे मंगळवार २१ सप्टेंबरपासून महाडीबीटी पोर्टल विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज तसेच जुना अर्ज नुतनिकरण करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्यासंदर्भात कार्यशाळा घेण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले.