बाळापूर : दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेला शेतकरी क्षणार्धात जीवन संपविताे, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमाेर समस्यांचा डाेंगर उभा राहताे. त्यांच्या मुलींच्या विवाहाचा माेठा प्रश्न समाेर उभा राहताे. काही दानशूरांच्या पुढाकाराने हा प्रश्नही सुटताे. अशाच प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी पुढाकार घेतला असून, माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प करून ते सामाजिक दायित्व निभवत आहेत.
आत्महत्येसारख्या सामाजिक दुर्घटनेनंतर मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकरी कुटुंबीयांना माेठा दिलासा मिळाला आहे. बाळापूर येथील ‘मराठा’ हाॅटेलचे संचालक असलेल्या मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. तसेच इतर आर्थिक संकटात असलेल्यांच्याही कुटुंबातील लग्नसाेहळ्यासाठी ते अल्पदरात भाेजन उपलब्ध करून देतात. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. शेतकऱ्यांच्या लेकीच्या लग्नकार्यासाठी पुढाकार घेतल्याचे पाेस्टर राउत यांनी समाजमाध्यमात पाेहाेचविले आहे.
अशी केली सेवाभावी कार्याची सुरुवात
राऊत यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर बाळापूर येथे ‘मराठा’ हाॅटेल आहे. काही वर्षांपूर्वी या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित केली हाेती. त्यावेळी त्यांचे हाॅटेलही ताेडण्यात आले हाेते. त्यांनी नव्याने हाॅटेलची उभारणी केली. महामार्गासाठी जमीन गेल्याने शासनाने माेबदला दिला. या माेबदल्याच्या रकमेपैकी काही रक्कम त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यावर खर्च करण्याचे ठरविले. त्यातूनच ते अशा कुटुंबातील मुलींचे लग्न विनामूल्य करून देणार आहेत.
------------------
पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल
राऊत यांनी नाेटबंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.
------------------
समाजात वावरत असताना वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून मी आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नकार्याची जबाबदारी घेतली आहे.
-मुरलीधर राऊत, बाळापूर