अकोला: अपघातामध्ये जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हात शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. कापलेला हात जमिनीत पुरण्याऐवजी खासगी रुग्णालयातील सफाई कामगाराने आपातापा रोडवरील दुबेवाडी परिसरात फेकून दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी सफाई कामगाराला ताब्यात घेतल्यावर वस्तुस्थिती समोर आली.आपातापा रोडवरील दमाणी नेत्र रुग्णालयाजवळील दुबेवाडी परिसरात गुरुवारी दुपारी महिलेचा हात आढळून आला. हाताचा पंजा, मनगट दिसून आल्याने महिलेची हत्या करून तिचे प्रेत परिसरात फेकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू झाली होती. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील, अकोट फैलचे एपीआय राजू भारसाकळे यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथक घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर घटनेचा उलगडा झाला. मूर्तिजापूर येथील एका विद्यार्थिनीच्या सायकलला ट्रकने धडक दिली. या अपघातात विद्यार्थिनीचा हात जायबंदी झाला होता. त्यामुळे विद्यार्थिनीला शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बुधवारी दुपारी विद्यार्थिनीवर शस्त्रक्रिया करून तिचा हात शरीरापासून विलग करण्यात आला. विलग केलेला हात पुरण्यासाठी रुग्णालयातील सफाई कामगार बंडू ऊर्फ बबलू तांबे याला सांगण्यात आले; परंतु बबलू तांबे याने हात जमिनीत पुरण्याऐवजी तो आपातापा रोडवरील झुडूपांमध्ये फेकून दिला. त्याच्या निष्काळजीमुळे पोलीस प्रशासन त्रस्त झाले. पोलिसांनी बबलू तांबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)श्वान पथक पोहोचण्यापूर्वीच घटनेचा खुलासाआपातापा रोडवरील दुबेवाडी परिसरात झुडूपांमध्ये महिलेचा तुटलेला हात आढळून आल्याने, परिसरात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याची चर्चा सुरू झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर हत्येच्या संशयातून पोलिसांनी तपास सुरू केला. वाशिम येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; परंतु त्यापूर्वीच पोलिसांना खरी वस्तुस्थिती कळली.अशी उघडकीस आली घटनाआपातापा रोडवर राहणारा मनपा सफाई कामगार मोंटू आणि विरू दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुबेवाडी परिसरात शेळ्या चारत होते. परिसरातील झाडाझुडूपांमध्ये चार ते पाच कुत्रे त्यांना दिसले. जवळ गेल्यावर दोघांनाही कुत्रे तुटलेल्या हाताची लचके तोडत असल्याचे दिसल्यावर त्यांनी अकोट फैल पोलिसांना माहिती दिली.कापलेला हात जखमी विद्यार्थिनीचामूर्तिजापूर येथील १४ वर्षीय प्रियल राजू वानखडे हिच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने, ती गंभीर जखमी झाली. तिला अकोल्यातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शस्त्रक्रियेदरम्यान शरीरापासून तिचा उजवा हात विलग करण्यात आला.