पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी दराप्रमाणे रक्कम भरपाई म्हणून द्यायला पाहिजे. परंतु पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन थट्टा करीत आहे. हा प्रकार सहन करणार नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अकोला जिल्हा अन्याय निवारण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास लहाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
दिलेल्या निवेदनात, मूग, उडीद हे पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे पूर्णत: जळून गेले आहे. त्यावर पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देत आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. वास्तविकता, पीक विमा कंपनीने हमी दराप्रमाणे मदत दिली नाही. तूर पिकाची सुद्धा नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात आली नाही. सोयाबीन व कपाशीवर बोंड अळीचा प्रकोप आल्याने सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले. यावर्षी पिकाचा हंगाम पूर्णत: तोट्यात गेल्यामुळे पीक विमा कंपनीने आणि शासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक जिल्हा अन्याय निवारण संघटना सहन करणार नाही. अन्यथा आंदोलन करू, असा इशारासुद्धा अन्याय निवारण संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास लहाने यांनी दिला आहे.