अकोला : राष्ट्रीय स्तरावर राज्याची संपादणूक पातळी आणि गणित व विज्ञान विषयातील राष्ट्रीय अध्ययन संपादणूक पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे १५ शाळांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्चून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहेत.राज्य शासनाकडून गतवर्षीपासून गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गणिताचार्य-भास्कराचार्य कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत अपूर्व विज्ञान मेळावे घेण्यात येत आहेत. वर्गात शिक्षणाचे वातावरण आनंददायी असावे, मुलांना सतत क्रियाशील ठेवून त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांची संशोधक वृत्ती जोपासावी. नावीन्याची माहिती मिळविणारे व कृतीस वाव मिळवून देण्यासाठी विविध वैज्ञानिक व गणिताची साधने वर्गात उपलब्ध करण्यासाठी माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय आविष्कार अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणे प्रस्तावित होते. त्यानुसार समग्र शिक्षा अभियानाच्या पुढाकारातून अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी दोन नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील वर्ग ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी हे विज्ञान केंद्र राहतील. विज्ञान केंद्रांमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची उभारणी झाली की नाही, याची तपासणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या करण्यात येत आहेत. त्यासाठी एक समिती गठित करण्यात असून, अधिव्याख्याता कविता बुरघाटे यांच्या नेतृत्वात तालुक्यांमधील विज्ञान केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात १५ शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र (अत्याधुनिक प्रयोगशाळा) उभारण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान विषयातील रुची वाढावी. हा त्यामागे उद्देश आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल.- श्याम राऊत, सहायक कार्यक्रमअधिकारी समग्र शिक्षा अभियान