अकोला: आनंददायी शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांमध्ये भाऊ-बहिणीचे स्नेहाचे नाते जुळावे, हसत-खेळत शिक्षण घ्यावे, या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनासोबतच लकी ड्रॉ काढून रक्षाबंधनाचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला.विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबतच सामाजिक संवेदना जोपासली जावी, नातेसंबधांची जाणीव व्हावी, नाती काय असतात, याचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावेत, या दृष्टिकोनातून दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत अभिनव अशा रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन १५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, पातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ, केंद्र प्रमुख रफत खान हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय बरडे होते. यावेळी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थिनीने चिठ्ठी काढून ज्या विद्यार्थ्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तिने त्या विद्यार्थ्याला राखी बांधावी. असा हा उपक्रम राबविण्यात आला. एवढेच नाही तर अधिकारी, शिक्षकांच्या नावानेसुद्धा चिठ्ठ्या काढण्यात आल्या. विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमासाठी शाळेतील पदवीधर शिक्षक सुरेश कातखेडे, विषय शिक्षक सुभाष टोळे, सहायक शिक्षिका दीपाली अंबरकर, सुरेखा बिजवे, अनिता खडसे, कॉन्हेट शिक्षिका जया टिकार, आरती केने, रेखा खेडकर यांचे सहकार्य लाभले.
बहिणीला मिळाला लकी ड्रॉ पद्धतीने भाऊ!लकी ड्रॉ काढून नाव निघालेल्या भावाला बहिणीने राखी बांधली. नुसतीच राखी बांधली नाही तर त्या भावाने त्या बहिणीला मदतसुद्धा करायची. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात नात्यांची गुंफण सैल होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना नातेसंबध कळावे, नात्यांचे मोल कळावे, त्यांच्या कोवळ्या मनावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी व्यक्त केले.