लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळे आंदोलन केले. अपंग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे या करिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या वार्षिक स्वउत्पनातील ३ टक्के निधी अपंग कल्याण व पुनर्वसनासाठी खर्च करण्याचा शासन निर्णय असला तरी, तेल्हारा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींनी सन २०११-१२ पासून अपंगांवर एकही पैसा खर्च केलेला नाही. ग्रामपंचायतींच्या या उदासिन धोरणामुळे सहा वर्षाचा अनुशेष निर्माण झाला असून, अपंग बांधव त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. अपंग बांधवांवर झालेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तेल्हारा तालुका प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश पाटील खारोडे यांच्या नेतृत्वात तेल्हारा गटविकास अधिका-यांना शासनादेशाची प्रत व ती वाचण्यासाठी चक्क भेट म्हणून चष्मा देण्यात आला. याचबरोबर अपंग बांधवांवर त्यांच्या हक्काचा निधी नियमानुसार खर्च करून त्यांना न्याय द्यावा. तसेच हा निधी खर्च करण्यात कुचराई करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे एक निवेदन सादर करण्यात आले. तसेच मागण्या त्वरित मान्य न झाल्यास, आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी रवींद्र ताथोड, गजानन नेमाडे, वैभव खाडे, भैय्या खारोड, शिवा पाथ्रीकर, योगेश तीव्हाने, प्रफुल्ल दबडघाव, सागर पाथ्रीकर, वैभव पाथ्रीकर, प्रमोद तायडे, मुन्ना कडू, शुभम भिसे, अक्षय साखरे, रोषण खुम्कर, भूषण पाथ्रीकर गोपाल ताथोड, श्रीकांत ताथोड, पंकज कोरडे, शिवाजी जोध, यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
तेल्हार्यात 'प्रहार'चे अभिनव आंदोलन : शासनादेश वाचण्यासाठी गटविकास अधिकार्यांना चष्मा दिला भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:21 PM
ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळे आंदोलन केले.
ठळक मुद्देअपंग निधी त्वरित खर्च करण्याची केली मागणीतालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींनी सन २०११-१२ पासून अपंगांवर एकही पैसा खर्च केला नसल्याची माहिती