अकोला: जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी दुरुस्ती कामाची चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सोमवारी देण्यात आले.
२०१५-१६ मध्ये ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात आले. या कामात अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी मागील जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केली होती, तसेच सोमवारी झालेल्या समितीच्या समितीच्या सभेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानुषंगाने ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची कामाची चौकशी करून, तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कुपनलिका ९० फूट खोल करण्याची परवानगी देण्याची मागणी सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, समितीचे सदस्य संजय अढाऊ, सुष्मिता सरकटे, मीरा पाचपोर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुभाष पवार, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनिस खान यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.