अकोला : जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २२ गावांत पाणीटंचाई निवारणाची कामे अपूर्ण असताना पूर्ण करण्यात असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला (मजीप्रा) देण्यात आले.
२०२१ या वर्षीच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात मंजूर असलेली ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे अपूर्ण असताना, पूर्ण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा मुद्दा जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात दोन दिवसांत चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संबंधित अभियंत्यांना सभेत देण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराब वडाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समिती सदस्य मीरा पाचपोर, सुश्मिता सरकटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.