अकोला, दि. ६- नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, सहारा व बिरला ग्रुपच्या डायरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने दाखविण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी, ८ नोव्हेंबरपूर्वी बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या पाच लाख कोटींच्या रकमेची चौकशी करण्यात यावी, नोटाबंदीपूर्वी तीन महिन्यांच्या कालावधीत बँकांमध्ये २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणार्यांची चौकशी करून, नावे सार्वजनिक करावी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेतून रक्कम काढण्याची २४ हजार रुपयांपर्यंंतची र्मयादा वाढविण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील स्वराज्य भवन येथून काढण्यात आला. गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हा काँग्रेसच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर करण्यात आले. या मोर्चात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक राजेश बघेल, वजाहत मिर्झा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, मदन भरगड, साजिदखान पठाण, दादाराव मते पाटील, महेश गणगणे, हेमंत देशमुख, आकाश कवडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, महानगराध्यक्ष सुषमा निचळ, नगरसेविका उषा विरक, डॉ. संजीवनी बिहाडे, स्वाती देशमुख, पुष्पा गुलवाडे, महेंद्रसिंग सलुजा, कपिल रावदेव, विलास गोतमारे, अविनाश देशमुख, राजेश भारती, नगरसेवक अब्दुल जब्बार, आझाद खान, मब्बा ऊर्फ महेबुबखान, नासीरखान, ईस्माईलभाई टीव्हीवाले यांच्यासह जिल्हय़ातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नोटाबंदी घोटाळ्याची चौकशी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 2:34 AM