अकोला: खारपानपट्टयातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये काही टँकरव्दारे तेलकट पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी मंगळवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत करण्यात आली. भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत खारपानपट्टयातील अकोला तालुक्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांपैकी ३५ गावांना खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये काही टँकर तेल वाहतूक करणारे असल्याने, ग्रामस्थांना तेलकट पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासंबधीचे वृत्त सोमवार, २३ मे रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले होते. यया वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषद सदस्य सरला मेश्राम यांनी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत खारपानपट्टयात काही टँकरव्दारे तेलकट पाणी मिळत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. टकरव्दारे पाणीपुरवठयात तेलकट पाण्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी सभेत केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गुडधी येथे शौचालय बांधकामांसाठी खड्डे करण्यात आले असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी शौचालयांची कामे पूर्ण करण्याची मागणीही सदस्य सरला मेश्राम यांनी सभेत केली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळी गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी व इतर सवलती जाहीर करण्यात आल्या; मात्र याबाबतची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत उपस्थित केला.
खारपानपट्टयातील तेलकट पाण्याची चौकशी करा!
By admin | Published: May 25, 2016 2:14 AM