लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : नगर परिषदेंतर्गत राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या २१ जून रोजी झालेल्या आमसभेत घेण्यात आला. नगरपालिकेच्या अंतर्गत जुनी वस्ती येथे आयएचएसडीपी योजनेंतर्गत घरकुले बांधण्यात आली आहेत. बांधण्यात आलेली घरकुले निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप लाभार्थींनी केला आहे. अनेक घरकुलांचे छत गळत असून, भिंतीला तडे गेले आहे. शौचालये लिकेज असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला होता. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या आमसभेत या लाभार्थींंच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली, तसेच घरकुलांच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये नगराध्यक्ष मोनाली गावंडे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक सुनील पवार, बांधकाम सभापती अफरोजा बी, भारत जेठवाणी, शासकीय न.प. अभियंता यांचा समावेश आहे. घरकुलांमध्ये असलेल्या त्रुटी संबंधित कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.
घरकुलांच्या तक्रारीवर चौकशी समिती
By admin | Published: June 24, 2017 5:55 AM