खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ करून थांबविल्याप्रकरणी चौकशी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. याप्रकरणी संबंधित तक्रार निवारण अधिकाऱ्याने दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
सुकळी येथील पशुपालक सुरेश किसन भिसे यांनी ३५ हजार रुपयांच्या अनुदानावर शेळीपालन शेडसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता. दि.१९ ऑक्टोबर २०२० रोजी शेळीपालन शेड बांधण्यास मंजुरी मिळाली होती. बांधकाम केल्यानंतर देयक लवकरच मिळेल, या आशेवर सुरेश भिसे यांनी व्याजाने पैसे घेऊन शेळीपालन शेडचे बांधकाम दि. १० जानेवारीरोजीपर्यंत पूर्ण केले; परंतु गेल्या आठ महिन्यांपासून देयक काढण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत ‘लोकमत’ने ७ सप्टेंबर रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच संबंधित तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी व पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. पशुपालकांकडून पैशाची मागणी पूर्ण न केल्याने संबंधितांनी आठ महिन्यांपासून हेतुपुरस्पर देयक काढण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.
----------------
पैशाची मागणी करणाऱ्यावर कारवाई होणार का?
शेळीपालन शेडचे देयक काढण्यासाठी संबंधितांनी केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून देयक काढण्यास हेतुपरस्पर टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, याप्रकरणी पैशांची मागणी करणाऱ्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.