अकोला: पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासकीय वैद्यकीय महािवद्यालय (जीएमसी) संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील कोवीड रुग्णांच्या भोजन व्यवस्थेची चौकशी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. निलेश अपार यांनी मंगळवार, ६ एप्रिलपासून सुरु केली.
सर्वोपचार रुग्णालयात कोवीड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर ५ एप्रिल रोजी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नीत सर्वोपचार रुग्णालयातील ‘मेस’ला भेट देऊन भोजन व्यवस्थेची पाहणी केली. त्यामध्ये मेसमधील धान्यसाठ्याची झाडाझडती घेतली असता, भोजन व्यवस्थेसाठी आठ महिन्यातील धान्य पुरवठ्याच्या नोदीच घेण्यात आल्या नसल्याचे आढळून आले. तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी डाळींच्या वापराचीही त्यांनी माहिती घेतली. भोजन व्यवस्थेत गोंधळ आढळून आल्याने, ‘जीएमसी’मधील भोजन व्यवस्थेची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.निलेश अपार यांना दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डाॅ.अपार यांनी ६ एप्रिलपासून ‘जीएमसी’मधील कोवीड रुग्णांच्या भोजन व्यवस्थेची चाैकशी सुरु केली आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘जीएमसी’मधील कोवीड रुग्णांच्या भोजन व्यवस्थेची चौकशी सुरु केली आहे. पहिल्या दिवशी भोजन व्यवस्था संदर्भात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
- डाॅ.निलेश अपार
उपविभागीय अधिकारी, अकोला.