लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील हुंडी चिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवसायाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रविवारी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकोला मंडळ अधीक्षक अभियंता गिरीष जोशी, कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) प्रकाश मुकुंद, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी शिक्षण, आरोग्य, सहकार, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या कामाचा विभागनिहाय आढावा घेतला. त्यामध्ये सहकार विभागाच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी हुंडी चिठ्ठी हा काय प्रकार आहे, अशी विचारणा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण लोखंडे यांना केली. जिल्ह्यात किती जण हुंडी चिठ्ठीचा व्यवसाय करतात, त्यामध्ये किती लोकांची लुबाडणूक होत आहे, तसेच अवैध सावकारी व्यवसायाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.
शहराला जिगावातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव सादर करा!भविष्यात अकोला शहरात निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शहराला जिगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका व संबंधित यंत्रणेने तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शहीद स्मारकाचा प्रस्ताव तयार करा!अकोला शहरातील मोर्णा नदीच्या काठावर लक्झरी बसस्थानकाजवळील जागेवर बांधा-वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर अत्याधुनिक शहीद स्मारक बांधकामासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
सर्वोपचारमध्ये १२०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्तावसर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक प्रभावी व्हावी, यासाठी १,२०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. शिवाय, रिक्त पदांसह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतर मुद्यांवरही लक्ष वेधले.
समिती गठित करून चौकशी करा!हुंडी चिठ्ठी, अवैध सावकारी व्यवसायासह मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीची पद्धत यासंदर्भात पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना दिले.
शिवजयंतीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करा !अकोला शहरातील शिवाजी पार्क ते अकोट फैलपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यानुषंगाने येत्या शिवजयंतीपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.