अकोला : स्थानिक गुन्हे शाखेतील चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या नावे दहा लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार विजय ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी गृह विभागाच्या उपअधीक्षकांकडून करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ट्रान्सपोर्ट संचालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचेही अहवालात नमूद असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
विजय ट्रान्सपोर्टचे तीन ट्रक नंबरप्लेटच्या हेराफेरीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे चालकांचे त्याच वेळी व त्याच दिवशी बयाण नोंदविले असता नंबर प्लेट संशयास्पद असल्याचेही उघडकीस आले होते. त्यानंतर या प्रकरणात ट्रान्सपोर्ट संचालकांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, तीन ट्रकच्या क्रमांकांमध्ये हेराफेरी असल्याचे तसेच त्याची बिल्टी बदलल्याचे व नंबरप्लेट बदलल्याचेही चौकशीत उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणात विजय ट्रान्सपोर्टचा संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचार्यांनी दहा लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी संबंधित पाच कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिला होते. यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे उपअधीक्षक नितीन शिंदे यांनी चौकशी केली. हा चौकशी अहवाल आयजी यांना सादर करण्यात आला असून, या चौकशीमध्ये विजय ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंड
नंबरप्लेटच्या हेराफेरीमुळे स्थानिक गुन्हे शाखेने तीन ट्रक ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुढील चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे ते प्रकरण पाठविण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने चौकशी केली असता ट्रकच्या नंबरप्लेटमध्ये संशयास्पद खोडतोड केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंड करण्यात आला आहे.