- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची विक्री करताना, खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यात आले की नाही, यासंदर्भात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली असून, बियाणे विक्रीसंदर्भात परवान्यांची माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) शुक्रवारी संबंधित खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांना दिले.जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू असून, पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात विविध खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्यांची विक्री करताना नियमांचे पालन करण्यात आले की नाही, यासंदर्भात पडताळणी करण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बियाणे विक्रीसंदर्भात घेतलेल्या परवान्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी संबंधित खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांना दिले.
कंपन्यांकडून अशी मागितली माहिती!सोयाबीन बियाणे विक्रीचा परवाना आहे का, बियाणे कोठे तयार करण्यात आले, बियाणे चाचणी अहवाल काय आहे, जिल्ह्यात कोणत्या वितरकास बियाणे वितरित केले, जिल्ह्यात बियाणे विक्रीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांची परवानगी घेतली आहे काय, बियाणे विक्रीसंदर्भात दैनंदिन अहवाल सादर केला आहे काय, इत्यादी प्रकारची माहिती ५२ खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी मागितली आहे.
सोयाबीन उगवले नसल्याच्या ९८९ तक्रारी!सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९८९ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४९६ शेतकºयांच्या तक्रारी ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात असून, उर्वरित तक्रारी विविध खासगी सोयाबीन कंपन्यांच्या बियाण्यासंदर्भात आहेत. एकूण प्राप्त तक्रारींपैकी ४३० शेतकºयांच्या तक्रारीसंदर्भात सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमध्ये पंचनामे करण्यात आले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी सोयाबीन कंपन्यांकडून जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोयाबीन विक्रीसंदर्भात गुन्ह्याचे स्वरूप पाहून संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.- मोहन वाघजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.