संतोष येलकर.........
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने पाच वर्षांपूर्वी खरेदी करून जिल्ह्यात शासकीय धान्य गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या १० हजार ४०० क्विंटल ज्वारीचा भुसा झाला. भुसा झालेल्या ज्वारीची केवळ २२ रुपये प्रति क्विंटल दराने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरू केल्यानंतर यासंदर्भात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून, चौकशीचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार समितीकडून जिल्ह्यातील गोदांमात भुसा झालेल्या ज्वारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली होती. खरेदी केलेली १० हजार ४०० क्विंटल ज्वारी जिल्ह्यातील तालुकास्तरावरील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या ज्वारीचा भुसा झाल्यानंतर, या ज्वारीची विल्हेवाट लावण्याचा आदेश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यानुसार २२ रुपये प्रति क्विंटल दराने भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने गत १५ जानेवारीपासून सुरू केली होती. भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये भुसा झालेल्या ज्वारीची चाैकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिला. जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांत साठवणूक केलेल्या ज्वारीचा भुसा झाल्यानंतर या ज्वारीची केवळ २२ रुपये प्रति क्विंटल दराने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीला दिले. त्यानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भुसा झालेल्या ज्वारीची चौकशी सुरू केली आहे.
चौकशी समितीमध्ये
‘यांचा’ आहे समावेश!
जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये भुसा झालेल्या ज्वारीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक लेखाधिकारी, एक साहाय्यक लेखाधिकारी व एक शेतकरी प्रतिनिधी इत्यादींचा समावेश आहे.
‘या’ मुद्द्यांची केली
जात आहे चौकशी!
आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेली ज्वारी, जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठवणूक केलेली ज्वारी, ज्वारीचा भुसा कसा झाला, ज्वारीची अत्यल्प दराने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया कशी सुरू करण्यात आली, ज्वारीचा भुसा होण्यापूर्वी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ज्वारीचे वितरण का करण्यात आले नाही, इत्यादी मुद्द्यांची चौकशी समितीकडून करण्यात येत आहे.