सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था बळकावल्याप्रकरणी पोलीस चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी संस्थापक संचालकांचे बयान नोंदविले असून, यामध्ये मोठा घोळ असल्याचे त्यांनी बयानात नमूद केले आहे.आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निदर्शनास येताच संस् थापक सभासदांना धक्का बसल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या किचकट प्रकरणी चौकशीस प्रांरभ केला असून, संस्थापक संचालकांचे बयान नोंदविले आहेत.
मृत्यू प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर२00१ मध्येच मृत्यू झालेले कैलास सरकाटे यांचे महापालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र काढण्यात आले असून, ते पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. यावरून कैलास सरकाटे यांची स्वाक्षरी करणार्याचे पितळ लवकरच उघडे पडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अमरावती येथे अहवाल सादरसाहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, या चौकशीचा अहवाल अमरावती येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल गोपनीय असल्याची माहिती आहे.
सरकाटे यांना श्रद्धांजली कैलास सरकाटे यांचे २00१ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. ज्या तीन लोकांनी २00१ मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याच तीन लोकांच्या नावाने ऑडिट रिपोर्ट, चेंज रिपोर्टमध्ये कैलास सरकाटे यांचे नाव टाकण्यात आले आहे. सदर तीन लोकांना सरकाटे यांचे निधन झाल्याचे माहिती असतानाही त्यांचेच नाव वापरून स्वाक्षरी केल्याचे असल्याचे स्पष्ट होत आहे.