संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त चढविल्याने तिला एचआयव्हीची लागण झाली. याबाबतचे वृत्त लोकमतने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. या गंभीर घटनेची दखल घेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार केली. लोकमतने त्याच दिवशी वृत्त प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. एका लहान मुलीला पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रक्त देण्यात आले होते. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार कारवाई केल्या जाईल. रक्तपेढीने रक्तदात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्वीकारणे आवश्यक होते. त्याचबरोबर ज्या खासगी रुग्णालयात त्या चिमुकलीवर उपचार सुरु होता. त्या रुग्णालयाने रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करणे आवश्यक होते. यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. याची पूर्ण चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल. असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
----------------------
असे आहे प्रकरण
हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या बालिकेला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीमधून पांढरे रक्त बोलाविण्यात आले. परंतु ते रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने आठ महिन्याच्या निष्पाप चिमुकलीलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले. यासंदर्भात चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी न्याय मागितला आहे.
------------------------
रक्तपेढीसह डॉक्टरांवर होणार कारवाई
या प्रकरणी रक्तदात्याकडून रक्त घेणाऱ्या रक्तपेढीसह त्या चिमुकलीला उपचारादरम्यान रक्त चढविणाऱ्या मूर्तिजापूर येथील डॉ. प्रशांत अवघाते यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. यात रक्तपेढी व रक्त चढविणारे डॉक्टर तेवढेच दोषी असल्याचे बोलल्या जाते.