अकोला : पंचायत समिती अकोलामधील ग्रामपंचायत वैराट राजापूर येथे स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ ग्रामीण अंतर्गत रविवारी केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांवरील सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा विल्हेवाटीची पाहणी व तपासणी करण्यात आली.पथकात प्रमुख अनुप कराळे, प्रतिनिधी विष्णू मेतकर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या तज्ज्ञ अपर्णा गणोरीकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गजानन महल्ले, विस्तार अधिकारी दीपक इंगळे, समूह समन्वयक पंकज टेंभुर्णे, राहुल अरखराव, ग्रामसेवक केशव घाटोळे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. ग्रामस्थांनी टाळ मृदंगाच्या गजरात चमूचे स्वागत करून स्वच्छता फेरी काढली. यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या. उघड्यावर शौच घाण आढळून आली नाही. दंडात्मक कारवाईचे फलक विविध ठिकाणी दिसून आले. सरपंच दादाराव खरात, सचिव राजीव गरकल, उपसरपंच प्रभुदास बोर्डे, सदस्य श्रीकृष्ण खराबे, देवीदास नंदाने, विनोद इंगळे, प्रमोद इंगळे, गोपाल कुकडे, विठ्ठल इंगळे, विनोद खरात, वसंतराव टाकळकार, योगेश मार्के, प्रकाश मैसने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार राजीव गरकल यांनी मानले.