अकोला, दि. १0- गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीज वापर कमी आढळून आलेल्या वीज ग्राहकांच्या वीज जोडणी व विद्युत मीटरची तपासणी करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत औद्योगिक ग्राहकांचे मीटर रीडिंग व प्रत्यक्ष वीज वापर, याचे मूल्यमापन करण्यात येत आहे. वीज वापर करणारे अनेक ग्राहक मात्र वीज देयक भरण्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून किंवा चक्क वीज वाहिनीवरून थेट वीज घेत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये औद्योगिक ग्राहकांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. यावर्षी अनेक औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर अचानक कमी झाल्याचे महावितरणच्या नोंदीमधून स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा वीज वापर कमी झाल्याने या वीज ग्राहकांकडून वीज चोरी तर होत नाही ना, अशी शंका येण्यास वाव असल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक ग्राहकांच्या विद्युत मीटर व जोडण्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या परिमंडळांमध्ये व्यापक प्रमाणात ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत वीज वापर अचानक कमी झालेल्या औद्योगिक ग्राहकांच्या विद्युत मीटर व वीज जोडणीची कसून तपासणी केल्या जात आहे. मोहिमेदरम्यान वीज चोरी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्राहकांविरुद्ध वीज कायद्यानुसार कारवाई होणार आहे.
वीज वापर कमी झालेल्या औद्योगिक ग्राहकांची तपासणी
By admin | Published: February 11, 2017 2:37 AM