संतोष येलकर.
अकोला : खरीप हंगामातील पेरण्यांच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून लक्ष (वाॅच) ठेवण्यात येत असून, जिल्ह्यातील बियाणे व खतांच्या १ हजार ४०४ दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीत काळाबाजार होऊ नये, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासंदर्भात विशेष लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात बियाण्यांच्या ६९० आणि खतांच्या ७१४ अशा एकूण १ हजार ४०४ दुकानांची तपासणी गत पंधरा दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अशी आहेत बियाणे व खतांची दुकाने !
तालुका बियाणे खते
अकोला १८९ १९९
अकोट १२२ ११४
बाळापूर ९० ९८
बार्शिटाकळी ६८ ७१
मूर्तिजापूर ६७ ७०
पातूर ७७ ७४
तेल्हारा ७७ ८८
...................................................................
एकूण ६९० ७१४
तपासणीत अशी घेतली जाते माहिती !
कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये दुकानांमध्ये उपलब्ध झालेला बियाणे, खते व कीटकनाशकांचा साठा, त्यामधून झालेली विक्री व शिल्लक असलेला साठा, तसेच संबंधित विक्रेता परवानाधारक आहे की नाही, बियाणे, खते व कीटकनाशक साठा अधिकृत कंपनीचा आहे की नाही, निश्चित करण्यात आलेल्या दराने विक्री होत आहे की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात येत आहे.
बियाण्याचे ११० . खतांचे २१ नमुने घेतले!
जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशक दुकानांच्या तपासणीत ८ जूनपर्यंत भरारी पथकांमार्फत बियाण्यांचे ११० नमुने घेण्यात आले असून, खतांचे २१ नमुने घेण्यात आले. बियाण्यांचे नमुने नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा आणि खतांचे नमुने औरंगाबाद येथील खते चाचणी प्रयोगशाळाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
बियाणे व खतांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांकडून जिल्ह्यातील बियाणे, खतांच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.
कांतप्पा खोत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या दुकानांची तपासणी भरारी पथकांमार्फत करण्यात येत आहे. तपासणीमध्ये आतापर्यंत विविध बियाण्यांचे ११० नमुने आणि खतांचे २१ नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
मिलिंद जंजाळ
मोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला.