अकोला: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गठित केलेल्या जिल्हास्तरीय तपासणी पथकाद्वारे तेल्हारा तालुक्यातील अडसूळ, दहीगाव, उकळी बाजार, माळेगाव बाजार या केंद्र शाळांना शुक्रवारी भेट देऊन तपासणी करण्यात आली.तपासणीत उकळी बाजार येथील बचत बँक व स्टार्स मेकर उपक्रम कौतुकास्पद असून, बचत बँकद्वारे जमा झालेल्या पैशातून विविध उपक्रम राबवण्याचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी ठरवले आहे. माळेगाव बाजार केंद्र शाळेने कॉन्व्हेंट संस्कृतीमध्येही पटसंख्या वाढीची परंपरा कायम ठेवली. दहीगाव शाळेतील विद्यार्थी इंग्रजीचे वाचन करून बोलतही असल्याचे दिसून आले. आडसूळ केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय भौतिक बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. फिरते विशेष शिक्षक (मोबाइल टिचर) यांचे नियोजन व कृती आराखडा उपलब्ध नसून, तो लवकर उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले. चारही केंद्रांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांच्याशी चर्चा करून शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तपासणी नमुन्यानुसार सर्व बाबींची पडताळणी करून सूचना देण्यात आल्या. त्रुटींची पूर्तता लवकर करून जिल्हा कार्यालयाला लेखी अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले. तपासणी पथकातील बिरमवार, नितीन सुदालकर, प्रशांत अंभोरे, शुभम बडगुजर, यांनी काटेकोरपणे तपासणी केली.