अकोला : ‘एमआयडीसी’स्थित ट्रान्सपोर्ट नगरमधील एका खासगी गोदामात बेकायदेशीर साठविण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा १५२ क्विंटल ‘रेशन’चा धान्यसाठा जप्त करण्यात आल्यानंतर, काळाबाजारातील ‘रेशन’च्या धान्याचा शोध घेण्यासाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी शनिवारपासून सुरू करण्यात आली.अकोला शहरानजीक ‘एमआयडीसी’मधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सिंधी कॅम्पमधील शीतलदास धर्मदास वाधवानी यांनी भाड्याने घेतलेल्या एका खासगी गोदामात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवार, ३० नोव्हेंबर रोजी धाड टाकली असता, गोदामात बेकायदेशीर साठविलेला सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत (रेशन)चा पाच लाख रुपये किमतीचा १२५ क्विंटल गहू आणि २७ क्विंटल तूर डाळ असा एकूण १५२ क्विंटल धान्यसाठा जप्त करण्यात आला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गतचा धान्यसाठा खासगी गोदामात बेकायदेशीररीत्या कसा साठविण्यात आला, हा धान्यसाठा कोठून आला, यासंदर्भात शोध घेण्यासाठी अकोला शहर, अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील रास्त भाव दुकानांची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना दिला. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या चार पथकांमार्फत शनिवार, १ डिसेंबरपासून अकोला शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली. अकोला शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील रास्त भाव दुकानांचीही तपासणी करण्यात येणार आहे.तपासणीत धान्यसाठ्याची अशी घेण्यात येत आहे माहिती!अकोला शहरातील रास्त भाव दुकानांच्या तपासणीत आॅगस्ट ते नोव्हेंबर अखेरपर्यंत रास्त भाव दुकानांमध्ये धान्याची करण्यात आलेली उचल, शिधापत्रिकाधारकांना केलेले धान्याचे वितरण आणि दुकानात शिल्लक असलेला धान्यसाठा इत्यादी प्रकारची माहिती तपासणी पथकांकडून घेण्यात येत आहे.चार पथकांकडून केली जात आहे रास्त भाव दुकानांची तपासणी!जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी करण्यासाठी चार पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी पूजा माटोटे, पुरवठा निरीक्षण अधिकारी अजय तेलगोटे, बाळापूरचे पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे, अकोटचे पुरवठा निरीक्षक गौरव राजपूत यांच्या नेतृत्वातील पथकांचा समावेश आहे. या चार तपासणी पथकांकडून शहरातील रास्त भाव दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.